सांगोला/प्रतिनिधी
सा.सांगोला शौर्य न्यूज नेटवर्कलोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सांगोला तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी लागणार आहे. सांगोला येथे प्रशासनाकडून २२ एप्रिल रोजी सरपंचपदाचे आरक्षण सोडत आरक्षण जाहीर झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच आरक्षणाची चर्चा गावांमध्ये रंगत होती. त्याचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून आता गावामध्ये निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. तर काही भावी सरपंचांच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचीसुद्धा डोकेदुखी होऊन बसली आहे. सरपंच आरक्षण हे त्यांच्या सोयीचे नसल्याने आता कार्यकर्त्यांना समोर करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पण इच्छुक उमेदवार नाराज आहेत. इच्छुक उमेदवारांचे समाधानकारक आरक्षण निघाल्याने काही कार्यकर्ते आनंदीदेखील झाले आहेत. वास्तविक पाहता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर जर कोर्टाचा निकाल आला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा लवकरच होऊ शकतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आजी माजी आमदारसुद्धा या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घालणार, असेही बोलले जात आहे.
