Solapur Rain News | संततधारमुळे पेरणीपूर्व कामे खोळंबली

Published On:
---Advertisement---

मे महिन्यातच पाऊस पडत असल्याने जून, जुलैमधील पावसाची सर्वांनाच चिंता

सोलापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. ऐन मे महिन्यातच पावसाळी वातावरण तयार झाल्याने येत्या जून, जुलै या महिन्यातील पावसात खंड तर पडणार नाही ना याची चिंता बळीराजांना लागली आहे. दरम्यान, ज्या भागांत पाण्याची सोय आणि बारिक पाऊस पडून वाफसा आहे, अशी ठिकाणी उडीदाची पेरणी सुरू करण्यात आली आहे.

दरवर्षी रोहिणी नक्षत्रावर पाऊस झाल्यानंतर वाफसा घेऊन मृग नक्षत्रापासून पेरणीला सुरुवात होऊन पुष्य नक्षत्रापर्यंत पेरणीचा कालावधी आहे. अवकाळी मोठ्या प्रमाणात पडल्यास पुढे पावसाळ्यात पाऊसमान कमी होतो, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असल्याने त्याचा बळीराजा चिंतेत आहे. खरीप हंगामासाठी 2 लाख 32 हजार 356 मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.एक लाख 22 हजार 531 मेट्रिक टन आवंटन शिल्लक तर 5 लाख 6 हजार 927 हेक्टर क्षेत्रासाठी 1 लाख 94 हजार 370 मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.

सार्वजनिक यंत्रणाकडे 11 हजार 511 मेट्रिक टन, खासगी स्तरावर 68 हजार 319 मॅट्रिक टन तर शेतकऱ्यांकडे एक लाख 14 हजार 540 मेट्रिक टन बियाणे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.

पुणे, फरिदाबाद येथे पाठविले सॅम्पल

गेल्यावर्षी जिल्ह्यातील बोगस बियाणे संदर्भात 63 तक्रारी आल्या होत्या. त्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. बियाणांची तपासणी ही पुणे आणि फरिदाबाद येथे होते. कृषी विभागाने आवश्यक बियाणे व खतांचे परीक्षण करावे. सॅम्पल तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी, अशा सूचनाही दिल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

खते, बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग न करता खते बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. लिंकिंग करणाऱ्या संबंधित विक्रेत्यांवर प्रशासनाकडून तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत, तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

– कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

Follow Us On