टेंभुर्णी बायपास महामार्गावरील घटना
टेंभुर्णी : कारमधून आलेल्या अनोळखी जोडप्याने पत्ता विचारण्याचे ढोंग करून वृद्धेस कारमध्ये बसवून डोळ्यात चटणी टाकून दीड लाख रुपये किमतीचे दागिने व रोख 50 हजार रुपये रोख असा 2 लाख 9 रुपये किमतीचा मुद्देमाल लुटला. ही घटना गुरुवारी दुपारी 12 ते दीडच्या सुमारास सोलापूर-पुणे बायपास महामार्गावर घडली.
शकुंतला शिवाजी देवकर (वय 65, रा. खांडवी, ता. बार्शी) असे लुटलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथील तिच्या मुलीकडे निघाली होती. दुपारी 12 च्या सुमारास टेंभुर्णी बसस्थानकात उतरून ती चालत फूटजवळगाव येथे जाण्यासाठी करमाळा चौकाकडे निघाली होती. बेंबळे चौकानजीक आल्यावर तिला कारमधील अनोळखी एक महिला व एक पुरुष यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. कुठे जायचे म्हणून विचारून देवकर यांना करमाळा चौकात सोडतो म्हणून कारमध्ये बसविले.

कारमध्ये बसल्यावर देवकर यांना अगोदर अकलूज रोडवरील शेवरे हद्दीत नेले. त्यानंतर टेंभुर्णी येथील सोलापूर-पुणे बायपास मार्गावरील सुर्ली रोडजवळ उसाच्या शेतात नेऊन दमदाटी करत डोळ्यात चटणी टाकली. तिच्याकडील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची बोरमाळ, पाच ग्रॅमचे कानातील वेल, पाच ग्रॅमचे कानातील फुले जुबे, बुगडी असे एक लाख 57 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 50 हजार रुपये, दोन हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण दोन लाख 9 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटून तिला तिथेच सोडून ते जोडपे निघून गेले. या घटनेत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अनोळखी जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दागिने ओढताना देवकर यांच्या कानास दुखापत
शकुंतला देवकर या गावी खांडवी येथे मोलमजुरी व मिळेल ते काम करून उपजीविका करीत होत्या. मोलमजुरीतून जमा झालेली तुटपुंजी रक्कम त्या त्यांच्या मुलीकडे देण्यासाठी येत होत्या. त्या दिवशी शकुंतला देवकर ह्या आपल्या मुलीकडे भेटण्यासाठी जात असताना ही घटना घडली. त्यांनी दागिने देण्यासाठी विरोध केल्याने डोळ्यात चटणी टाकून दागिने अक्षरशः ओरबाडून घेतले. यामुळे दोन्ही कानास जबर दुखापत झाली आहे.