SANGOLA :सांगोल्यात विनापरवाना वाहतूक करताना कडूलिंबासह चिंचेचे जळावू लाकूड जप्त

Published On:
---Advertisement---

सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांची मोठी कारवाई

सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी व वनरक्षक हटकर मंगेवाडी यांच्या पथकाने हटकर मंगेवाडी येथील वनक्षेत्रात फिरतीवर असताना सुमारे ४० हजार रुपये किमतीचे १३ टन (२६.२० घमी) कडूलिंबासह चिंचेचे जळावू लाकूड विनापरवाना वृक्षतोड व वाहतूक करताना ट्रक पकडून जप्त केला. ही कारवाई शनिवार, दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता जवळा ते हातीद रोडवर केली.

याप्रकरणी चंद्रकांत भाऊ आलदर (रा. घेरडी) व नारायण ज्ञानोबा काशिद (रा. कडलास, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध वन विभागांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले.

वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत वनविभाग कार्यक्षेत्रात फिरतीवर असताना शनिवारी जवळा ते हातीद रस्त्यावर वाहनांची तपासणी दरम्यान एमएच १०/एव्ही ८६२२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सुमारे २६.२० घमी कडूलिंब व चिंचेचे जळावू लाकूड विनापरवाना वृक्षतोड करून वाहतूक करताना ट्रक पकडला.यावेळी वन अधिकाऱ्यांनी चालक चंद्रकांत आलदर याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्यांच्याकडे वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसून आले.

वन अधिकाऱ्यांनी लाकूड मालाचा पंचनामा चालकाचा जबाब घेऊन सुमारे १३ टन, ४० हजार रुपये किमतीचे लाकूड ट्रकसह जप्त केले. वनरक्षक एस. व्ही. नरळे यांनी प्रथम वनगुन्हा क्र.ओ-०१/२०२५ यानुसार २६ जुलै रोजी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे आशिष ठाकरे तसेच उपवनसंरक्षक, सोलापूर कुलराज सिंह व सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर ए. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वनपाल जुनोनी एस. एल. वाघमोडे, हटकर मंगेवाडी वनरक्षक एस. व्ही. नराळे यांनी केली.

Follow Us On