सांगोला, ता. १७ : महूद ग्रामस्थांना गेल्या तीन-चार महिन्यापासून दुर्गंधीयुक्त अशुद्ध पिवळसर पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो आहे.याबाबत वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन कोणतीही दखल घेत नाही.ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निर्ढावलेल्या व्यवस्थेला जाग आणण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बाजारे यांनी ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहिरीवरच ठिय्या आंदोलन करून शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी केली.

महूद येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा विहिरीमध्ये थेट ओढ्यातील पाणी उतरत आहे.चालू वर्षी लवकर पाऊस झाल्याने शिवाय गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणी घेऊन या विहिरी शेजारी असलेल्या बंधाऱ्यात साठवले जाते. गेल्या अनेक वर्षापूर्वी ओढ्यातील पाणी पाणीपुरवठा विहिरीत यावे यासाठी सुमारे पंधरा फुटा खाली ओढ्यातून सायपनसाठी मोठी पाईप विहिरीमध्ये टाकण्यात आली आहे.कासाळगंगा उपनदीचे पुनर्जीवन झाल्यानंतर या उपनदीतील वाळू चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.या उपनदीच्या वाळूवर अनेक वाळू माफिया व त्यांचे आका पोसले जात आहेत.या वाळू माफीयांनी पाणीपुरवठा विहिरीजवळ खोलवर टाकलेल्या सायपन पाईपच्या वरील तसेच पाणीपुरवठा विहिरीच्या परिसरातील ही वाळू चोरून नेली आहे. त्यामुळे ओढ्यात व बंधाऱ्यात साठलेले कमालीचे घाण दुर्गंध युक्त पाणी थेट पाणीपुरवठा विहिरीमध्ये उतरत आहे.

थेट ओढ्यातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे.यामुळे नागरिकांना जुलाब उलट्या पोटदुखी यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.महूद ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत केवळ पाणीपुरवठा टाकीत टीसीएल पावडर टाकण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही उपाययोजना केली नाही.ही बाब वारंवार लक्षात आणून देऊनही ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन अजिबात लक्ष देत नाही.याबाबत आपण काहीच करू शकत नाही असे सांगत प्रशासनाने हात झटकले.ग्रामस्थांच्या आरोग्याची ग्रामपंचायतीने खेळ चालविला आहे,याबाबत त्यांना जाग यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बाजारे यांनी थेट पाणीपुरवठा विहिरीवरच सोमवार(ता.१४) रोजी उपोषण व ठिय्या आंदोलन केले.जोपर्यंत गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन महूद गावाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची हमी देत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही,असा पवित्रा बाजारे यांनी घेतला होता.यावेळी धनाजी कांबळे,व्यसनमुक्त संघटनेचे अध्यक्ष मोहन जाधव उपस्थित होते.

चौकट १) गावाला दुर्गंध युक्त पाणी तर ग्रामपंचायतीत जारचे पाणी..
ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण गाव हिरवे पिवळसर दुर्गंधी युक्त अशुद्ध पाणी पीत आहे.गावाला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत उदासीन असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी फिल्टर व गार केलेले जारचे पाणी पीत आहेत,असे सांगत जितेंद्र बाजारे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील पाण्याने भरलेला जार ओतून दिला.व येथे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ग्रामपंचायत पुरवठा करत असलेले पाणीच प्यावे असा आग्रह धरला.
चौकट २) गट विकास अधिकारी यांनी केली पाणीपुरवठा विहिरीची पाहणी
जितेंद्र बाजारे यांनी सोमवारी पाणीपुरवठा विहिरीवरच उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले होते. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा बाजारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून आपण स्वतः पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत सांगू असे आश्वासन दिल्यानंतर बाजारे यांनी उपोषण माघारी घेतले होते. त्यानंतर बुधवार (ता.१६) रोजी गटविकास अधिकारी यांनी समक्ष पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.त्यातील दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पाहून नाराजी व्यक्त करत यावर तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले. शिवाय पिण्याचे पाणी जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत हे पाणी पिण्यास वापरू नये अशी दवंडी देण्याची सूचना केली. मात्र काल दिवसभर आणि आज दिवसभर महूद ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची दवंडी देण्यात आली नाही.
चौकट ३) गटविकास अधिकाऱ्यांनी शिरभावी पाणी योजनेची थकीत पाणीपट्टी वसूल करून योजना कार्यान्वित करावी
गटविकास अधिकारी महूद येथे पाणीपुरवठा विहिरीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी आंदोलन कर्ते जितेंद्र बाजारे यांना आपण पाणीपट्टी व घरपट्टी भरली आहे का असा सवाल केला.त्यावर जितेंद्र बाजारे यांनी ही माहिती आपण ग्रामविकास अधिकारी श्री. शिंदे यांना विचारावी असे सांगितले. शिवाय तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीकडे शिरभावी पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकीत असल्याने ही योजना बंद आहे. गटविकास अधिकारी यांनी स्वतः याबाबत पुढाकार घेऊन पाणीपट्टी वसूल करून भरल्यास शिरभावी पाणी योजनेतून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा तालुक्याला होईल असे जितेंद्र बाजारे यांनी सांगितले.
