गटविकास अधिकाऱ्यांनी शब्द दिला; रात्री उशिरा उपोषण घेतले मागे
सांगोला : गेल्या तीन-चार महिन्यांपासून महूद गावाला दुर्गंधीयुक्त अशुद्ध, पिवळसर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असूनही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने सोमवार, दि. १४ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बाजारे यांनी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवर दिवसभर ठिय्या मारून उपोषण सुरू केले. जोपर्यंत गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी महूदगावाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची हमी देत नाहीत, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान, रात्री उशिरा गटविकास अधिकाऱ्यांनी शब्द दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. गेल्या तीन-चार महिन्यांपासून महूद गावाला होणाऱ्या अशुद्ध पिण्याच्या पाणीपुरवठ्याविषयी
ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना वारंवार तक्रार केल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा टाकीत टीसीएल पावडर टाकण्याव्यतिरिक्त काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अशुद्ध पिवळसर पाण्यामुळे ग्रामस्थांना उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्याआरोग्याशी खेळत असल्याचा आरोप केला. तसेच पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सोमवार, दि. १४ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बाजारे यांनी महूद ग्रामपंचायत कार्यालयात येऊन पाणी अशुद्ध येत असल्याबाबत ग्रामविकास बाळासाहेब शिंदे यांच्याकडे विचारणा केली.
यावेळी त्यांनी मी याला काहीच करू शकत अधिकारी नाही, असे बोलून हात झटकले. दरम्यान, ओढ्याच्या बंधाऱ्यातून थेट सायपनद्वारे विहिरीत पाणी आणून सोडल्यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य धनाजी कांबळे, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष मोहन जाधव उपस्थित होते.
गटविकास अधिकाऱ्यांनी दिली भेट…
गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी स्वतः पाणीपुरवठा विहीरीवर भेट देऊन गावाला स्वच्छ पाणीपुरवठा कसा करता येईल, याबाबतचे आश्वासन दिले. तसेच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनीही येत्या चार दिवसात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेत असल्याचे जितेंद्र बाजारे यांनी सांगितले.