Danglkar Nitin Chandanshive : बापाच्या ओंजळीत दडवलेलं स्वप्न…!!!

Published On:
---Advertisement---

दहावीचा निकाल लागला.मी फक्त भूगोल विषयात पास झालो.बाकीच्या सगळ्या विषयात नापास.बाप गवंडी काम करायचा.बापाला माझा निकाल कळला.पण बाप रागावला नाही.फक्त इतकंच म्हणाला, “उद्या लवकर उठ.माझ्या हाताखाली गडी म्हणून कामाला चल.हळू हळू तुलाही गवंडी काम शिकवून एक नंबरचा गवंडी करतो.”

दुसऱ्या दिवशी सकाळी बापाच्या सायकलवर मागे चाळण बांधून आणि हातात खोऱ्या घेऊन माझ्या नव्या जगण्याला सुरवात करायला मी निघालो होतो.बाप पुढं सायकल धरून चालत होता मी मागून चाळण घट्ट पकडून चालत होतो.पहिल्याच दिवशी बापाने माल कालवायला शिकवलं.बाप पाडावर चढला.मी आधी विटा दिल्या.नंतर मालाची पाटी उचलली आणि पाडावर बसलेल्या बापाच्या हातात पाटी टाच उंचावून दिली.तेव्हा बापाच्या डोळ्यातलं पाणी माल असलेल्या पाटीत पडताना मला सकाळच्या कोवळ्या उन्हात स्पष्ट दिसलं.माझ्या लक्ष्यात आलं आपल्या पोराचं ही आयुष्य गवंडी काम करण्यात माझ्यासारखं जाणार याची बापाला जाणीव झाली.

चार पाच पाट्या दिल्यानंतर माझ्या उजव्या पायात मोळा घुसला.चांगला तीन इंच मोळा आत घुसला.लई जोरात ओरडलो.बापाने पाडावरून उडी मारली आणि माझा पाय मांडीवर घेऊन बाप मी चाळून ठेवलेल्या वाळूत बसला.पायात घुसलेला तो मोळा जोरात ओढून बाहेर काढला.रक्ताची धार लागली.बापाने त्यावर तंबाखू टाकली आणि मला बाप म्हणाला, “भिंतीच्या आड जाऊन त्यावर लघवी कर. बरं होईल.माल कालवला आहे जाता येणार नाही.तू बस..आराम कर..माझं मी सगळ काम करतो.संध्याकाळी जाता जाता डॉक्टरला जखम दाखवून जाऊ.” दिवसभर बाप एकटाच राबला.मी माझी जखम सांभाळत बाप अनुभवत राहिलो.पण त्याच दिवशी एक धडा मिळाला.माणसाने आपल्या जखमा लपवून आपलं हातातलं काम आधी केलं पाहिजे.माझा बाप तेच करत होता.खरंतर जखम मला झाली होती पण वेदना बापाला होत होती.

पाटीवर चार बहिणी.आजी,आजोबा आणि आई अशी आठ माणसं माझा बाप एकटा सांभाळत होता.बापाच्या हातातली थापी लवकरात लवकर काढून घ्यायची. बापाचं काम बंद करायचं हेच माझं ध्येय आणि खरंतर हेच खरं करिअर असं मनात आलं.आणि मी गाव सोडलं.पुण्यात आलो.भाजीपाला विकला.वॉचमन झालो.पुन्हा दहावी दिली.पास झालो.मग शिक्षण आणि काम करत राहिलो.रेल्वे स्टेशन वर झोपून दिवस काढले.या सगळ्यात शब्दांचा लळा लागला.कविता लिहू लागलो.दिवसभर काबाड कष्ट करून जरा वेळ मिळाला की जगण्याला विसावा म्हणून कविता लिहायला सुरुवात केली.आणि बघता बघता कवितेने मला जगवायला कधी सुरवात केली कळलंच नाही.

माझ्या वयाच्या बाविसाव्या वर्षी मी माझं करिअर पूर्ण केलं.माझ्या बापाच्या हातातली थापी मी सोडवली. पाडावर उभं राहून बांधकामाला ओळंबा लावणारा बाप मी रिटायर केला.चार बहिणीची लग्न झाली.आता माझं लग्न करायला हवं हा विचार माझ्या मनात नसताना सुद्धा बापाचाच एक दिवस फोन आला आणि बाप म्हणाला, “ येत्या सतरा तारखेला तुझं लग्न आहे.तयार रहा.मी मुलगी बघितली आहे.” बापाने सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आणि लग्न केलं.आणि खरं सांगू संसार सुखाचा झाला.दोन नातवंडं बापाच्या मांडीवर खेळायला दिली.बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला वाटलं आता आपलं करिअर झालं.

मी माझा संसार घेऊन पुण्यात आई आणि बाप गावाला.बापाला आणि आईला साधा खोकला आला तरी तिकडे जीव तळमळत राहायचा. एक दिवस डोकं औट झालं आणि पुणे सोडून माझं बिऱ्हाड घेऊन थेट गाव गाठलं.बाप लई खुश झाला.अर्धी का होईना पण इथच सुखाने भाकरी खाऊ असं म्हणणारा बाप पाहून मलाही आनंद झाला.

        आयुष्यभर लोकांची घरं बांधणारा बाप.पण स्वतःचं घर मातीचं.हळू हळू घर झालं. घराचा इतिहास ही फार मोठा आहे.पण घर झालं.बापाने कधी स्वप्ने पाहिली असतील की नाही माहीत नाही.बापाला कधी स्वप्ने पडत असतील की नाही माहीत नाही.पण स्वप्नांचा पाठलाग करणारा बाप पोरांच्या हाताला धरूनच धावत असतो हे  बाप झाल्यावर मला कळलं.

        कधी कधी कुणाच्या तरी लग्नाला जाताना वऱ्हाड निघायचं तेव्हा बाप त्या वाहनात पुढं ड्रायव्हर जवळ बसायचा.बापाला भारी वाटायचं.इतरवेळी बाप कायम एस. टीने च फिरला.कधी कधी आम्हाला घेऊन बाप रेल्वेने जायचा तेव्हा आमचं जनरल डब्याचं तिकीट ठरलेलं असायचं. फलाटावर गेलं की बाप एकतर सगळ्यात पुढे नाहीतर सगळ्यात मागे न्यायचा आम्हाला.आणि बाप म्हणायचा “आपला डब्बा इथं येत असतो.म्हणजे जनरल डबा हक्काचा.”

         पण कधी न कधी बापाने स्वतःच्या गाडीत पुढच्या सीटवर ड्रायव्हर सोबत बसताना स्वतः मालक झालेलं स्वप्न नक्कीच पाहिलेलं असणार.आणि ते कधीही पूर्ण होणार नाही हे ठरवून पुन्हा ते स्वप्न कधीच बघितलेलं नसणार.

गेल्या दोन वर्षापासून बापाचं हेच कधीही बोलून न दाखवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रवास सुरू होता.ती धडपड सुरू होती.तो प्रवास आज मी पूर्ण केलाय.

          प्रिय तीर्थरूप वडील,पिताश्री,पप्पा, डॅड, आणि माझे आण्णा….

          ही नवी कोरी कार माझ्याकडून आपल्याला सप्रेम भेट.

आज संत तुकोबा त्यांची पालखी घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला निघत आहे.आज वारीचा प्रवास सुरू होतो आहे.सगळी दुनिया पांडुरंगाला भेटायला ज्ञानोबा आणि तुकोबासोबत पंढरपूरला निघाली आहे.ही समतेची वारी निघण्याच्या या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर ही गाडी तुम्हाला भेट म्हणून देतोय.ज्याचा त्याचा पांडुरंग ज्याचा त्याला भेटत राहील.पण माझा पांडुरंग माझा बाप.. तुम्हीच माझे पांडुरंग.

       जसं जमलं तसं जमवून हा सगळा प्रपंच घडवून आणून ही गाडी घेतली आहे.ड्रायव्हर ठेवण्याइतका मी अजून मोठा झालो नाही अण्णा…पण तूर्तास ती जबाबदारी मी पार पाडत राहणार आहे.आयुष्यभर सायकलचे पॅन्डेल मारणाऱ्या पायांना आता विश्रांती द्या.आणि अगदी थाटात मालक होऊन तुमच्या बायकोसोबत स्वतःच्या गाडीतून तुम्हाला जिथं जावं वाटेल तिथं जा…

      ओळंब्याच्या एका रेषेत थेट आयुष्य जगलेल्या,पाटी आणि खोऱ्यासारखं कष्टाचं हत्यार होऊन सेवा देत राहिलेल्या,भिंतीवर माल मारणाऱ्या थापीसारखं माझ्यावर उधळून आयुष्य जगलेल्या…. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला…बापमाणसाला पुढच्या प्रवासाला या लेकाकडून वाळूच्या ढिगाएवढ्या शुभेच्छा…!!!

तुमचाच ड्रायव्हर.

कवी नितीन चंदनशिवे.

070209 09521

Follow Us On