लोकनेते भाई डॉ.गणपतराव देशमुख यांची नात व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कन्येचा शासकीय अंगणवाडीत प्रवेश

Published On:
---Advertisement---

लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण– पेनुर अंगणवाडी केंद्रात अमूल्या निकिता देशमुख यांचे नावनोंदणी

सांगोला: दि.१६ जून लोकनेते कै. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांची नात व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपली कन्या अमूल्या निकिता बाबासाहेब देशमुख हिला जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत येणाऱ्या पेनुर येथील अंगणवाडी केंद्रात दाखल करून समाजामध्ये एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश दिला आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख हे स्वतः उच्च शिक्षण घेतलेले असून त्यांनी आपली मुलगी खाजगी शाळेऐवजी सरकारी अंगणवाडीत प्रवेशित करून शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधोरेखित केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात बालविकास विभागात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका, सहायिका, पालक वर्ग तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय हे दाखवून देतो की, शासकीय सेवा, विशेषतः बालविकास योजनांतर्गत असलेल्या अंगणवाड्याही दर्जेदार आणि विश्वासार्ह असू शकतात.

अनेकदा सामान्य जनतेमध्ये शासकीय अंगणवाड्यांबाबत शंका अथवा अनास्था आढळून येते. मात्र, लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेऊन या व्यवस्थेवर विश्वास दाखवणे हे शासकीय यंत्रणेतील कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे ठरत आहे. “सर्वांना समान संधी” या लोकशाही तत्त्वाशी सुसंगत असा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या या कृतीमुळे ग्रामीण भागातील पालक वर्गातही नव्याने सरकारी शिक्षण संस्थांकडे वळण्याचा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us On