रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; स्थानिक ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत
सांगोला:चिकमहुद तालुका सांगोला येथील जाधववाडी तळेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक कोटी 65 लाख रुपये खर्चून डांबरीकरण रस्ता करण्यात आला.परंतु सदर रस्ता करत असताना सदर ठेकेदाराने रस्ता हा निकृष्ट दर्जाचा केला आहे. तसेच सदर रस्ता हा या ठिकाणी असलेल्या तलावातून जात आहे.ज्या ठिकाणी तलावामधून रस्ता जात आहे.त्या ठिकाणी उंच ब्रिज केलेले नाही.त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सदरचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील जाधववाडी तळेवाडी हा रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला आहे.यामुळे हा रस्ता पाण्यातून आहे का? पाण्यावरून रस्ता आहे हेच लक्षात येत नाही.

त्यामुळे जाधवाडी तळेवाडी खरात वस्ती व अचकदानी होऊन येजा करण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.सदर ठेकेदाराने सदरचा रस्ता हा अत्यंत निकृष्ट केला आहे. प्रशासनाच्या वतीने या रस्त्यासाठी एक कोटी 65 लाख रुपये खर्च करून सुद्धा जर हा रस्ता नागरिकांना वापरता येत नसेल तर हा रस्ता केलाच कशाला? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.तसेच स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केवळ शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप करण्याच्या उद्देशाने मनमादी पद्धतीने हा रस्ता केला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे.

सदर रस्ता सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी सदर रस्ता हा ज्या ठिकाणी तळ्यामधून जात आहे त्या ठिकाणी मोठ्या ब्रिज करावा यासाठी काही दिवस सदरचे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु सदर ठेकेदाराने संबंधित ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता या ठिकाणी तळ्यातून रस्ता केला. यामुळे हा रस्ता आता थोड्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्णपणे पाण्यात गेला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्ता झाला. पाच वर्षे न होताच हा रस्ता पाण्यात गेला आहे.
यामुळे येथील प्रमुख वाडीवस्तीना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या ठिकाणी वास्तव्यस्त असलेल्या नागरिकांना तसेच गरोदर माता,अबलवृद्ध व वयोवृद्ध ग्रामस्थांना दवाखान्यासाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सदर ठिकाणी साधारणतः पंधराशे लोक वास्तव्य करीत आहेत. तरी संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी तळ्यामधील रस्त्याच्या ठिकाणी मोठा ब्रिज बांधून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे.अन्यथा येणाऱ्या काळामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.