बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी येथे सिंह असल्याचा व्हिडिओ व्हायरल करणारा युवक ताब्यात

Published On:
---Advertisement---

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवणारावरती कायदेशीर कारवाई करणार- वन परिमंडळ अधिकारी 

बार्शी/ प्रतिनिधी आपल्या परिसरात सिंह आल्याची माहिती किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात आता थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.नागरिकांना सतर्क करण्याच्या नावाखाली त्यांच्यात भीती पसरविली जात आहे.अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात आता थेट फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बार्शी तालुक्यातील मौजे तुर्क पिंपरी येथील एका तरुणाने इंस्टाग्राम वरून एक व्हिडिओ बनवून तो एडिट केला. व अंधारात झाडी मध्ये सिंह ओरडत असल्याचे ऐकू येत असतानाचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.त्यामुळे सदर परिसरात घबराट पसरली. त्यामुळे साखर कारखाना प्रशासनाने सदर व्हिडिओ वन परिमंडळ अधिकारी वैराग धनंजय शिदोडकर यांना पाठविला.

त्यानंतर वन अधिकारी हे तपास पथकासह जागेवर जाऊन पाहणी केली असता कोठेही वाघाचे किंवा सिंहाचे पायाचे ठसे दिसून आले नाही. तसेच व्हिडिओमधील आवाज सिंहाचा असल्याने वन अधिकाऱ्यांना संशय आला. व व्हिडिओ बनविणाऱ्या बद्रुद्दिन अन्सारी या तरुणाची सखोल तपासणी सुरू केली. पण तो गुन्हा मान्य करीत नसल्याने त्यास बार्शी येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्यास ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणून अधिकची चौकशी केली असता त्याने सदर व्हिडिओ एडिट केल्याचे कबूल केले.

सदर घटनेच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडून घाबरून जाऊ नये. असे आवाहन धनंजय शिदोडकर वन परिमंडळ अधिकारी वैराग यांनी केले आहे.तसेच कोणीही अफवा पसरवू नये.अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही सांगितले. सदरची कारवाईत बालाजी धुमाळ वनरक्षक पानगाव,सिद्धेश्वर जाधव वाहन चालक, शहाबाज मुल्ला वाहनचालक यांनी सहभाग घेतला. सदरची कारवाई माननीय श्री अजित शिंदे सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.याप्रकरणी तपास कामी पोलीस प्रशासनाने वनविभागास सहकार्य केले.

Follow Us On