एका दाखल्याचा अर्ज भरण्यास लागतो अर्धा ते पाऊण तास
सांगोला:गेल्या काही दिवसांपासून शहरातील व ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहेत.याचाच फायदा घेत महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांच्या सेवेकरिता शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले आहेत. मात्र, याचा फायदा होण्याऐवजी नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासनाच्या विविध दाखल्यांची गरज भासत आहे. पैसे देऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र शहरात आहे.

तांत्रिक दोषांमुळे महाऑनलाइन पोर्टल दिवसभर बंद राहत असल्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळण्यास विलंब होत आहे.याबाबत तक्रारी वाढत असल्याने तहसीलदार यांनी यांची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान कक्षाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांना पत्र पाठवून, आपले सरकार सेवा केंद्राकरिता महाऑनलाइन पोर्टलची सुविधा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने तत्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करावी असे नागरिक व विद्यार्थ्याकडून बोलले जात आहे.
सध्या १० वी आणि १२ वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. प्रवेश प्रक्रियेला सुरुवातही झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांस लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर गर्दी केली आहे. तथापि गेल्या आठ दिवसांपासून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर अर्ज दाखल करताना ऊपस् ५०५ असा एरर येत आहे.त्यानंतर सव्हर आपोआप बंद पडते. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोर्टल खूपच सावकाश चालते.
तसेच एका दाखल्यासाठी सुमारे ३० ते ४५ मिनिटे लागतात. दाखल्यासोबत सादर करावी लागणारी कागदपत्रे अपलोड करताना उपस् ४०४ एरर येतो. आणि पोर्टल बंद पडते. सध्या शालेय प्रवेश कालावधी असल्यामुळे दाखले काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विद्यार्थी व नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु सर्व्हर चालत नसल्यामुळे सेतू केंद्र चालकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.तरी संबंधित प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना व नागरिकांना येणाऱ्या अडचणी पासून मुक्तता करावी.अशी मागणी होत आहे.