आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश
॥ मुंबई : पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढवणारे आहेत. यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे. सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.
आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या १० दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.

पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप व लाऊड स्पीकरवर बंदी असावी, प्रत्येक पालखीला जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अॅम्ब्युलन्ससोबत कार्डियाक अॅम्ब्युलन्स, – दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, वाखरी वारकरी तळ मॉडेल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या. या सूचनांवर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन फडणवीस पुढे म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ३६ वॉटर प्रूफ मंडपांची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास ते वाढवण्यात येतील. या वर्षीही वारकऱ्यांना समूह विमा राहणार आहे. पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
वाखरी मॉडेल वारकरी तळ करणार
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. यावेळची गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. पालखी मार्गातील त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.
