भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग सुविधेचा लाभघेण्याचे मंदिर समितीचे आवाहन
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पध्दतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून निःशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे, यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाला भेट देऊन, मुख्य पृष्ठावर Pass Booking या लिंकवर क्लिक करा, बुकींग फॉर्म भरा, बुकींग तारीख निवडा, माहिती भरा, फोटो अपलोड करा, बुकिंग पूर्ण करा, पास डाउनलोड व प्रिंट करा, बुकींग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे 15 मिनिटे अगोदर भेट द्या व आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवा आणि पासची तपासणी करून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा. सदरची सुविधा निःशुल्क असून, यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही.
सदर संकेतस्थळावर मंदिराची माहिती, देणगी, पूजा बुकींग, भक्तनिवास बुकींग व दर्शन पास बुकींगची सोयदेखील उपलब्ध आहे. या ऑनलाईन सुविधांचा भाविकांनी लाभघ्यावा. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहनही व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.
मंदिर समिती बुकिंग केंद्र स्थापन करणार
पंढरपूर शहर व परिसरातील महा-ई-सेवा केंद्र येथे व मंदिर समितीमार्फतही लवकरच बुकिंग केंद्र स्थापन करून भाविकांना बुकिंगची सोय उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न आहे.