मा. सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयातील सन २०१०-११ दहावी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
चिकमहुद तालुका सांगोला येथील मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयातील २०१०-११ तुकडीच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. ‘तब्बल १४ वर्षांनंतर आठवणींचा वर्ग भरला, तो आम्हा जणू स्वर्गासमान भासला,’ अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.या शाळेतील दहावीच्या २०१०-११ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दिवगत शिक्षक बी. एस.पाटील सर यांना आदरांजली वाहून करण्यात आली.
यावेळी आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा..!शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई -वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते.ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाही अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.
यावेळी साधारण ३५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी प्रथम तत्कालीन शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी बळीराजा सराटे, जोतीराव पिंपळे, नामदेव धांडोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दशरथ दिघे सर, दयानंद राक्षे सर, नामदेव सातपुते सर, मुलाणी सर,मोरे बी.जी.सर,शेषनाथ इंगोले सर,घाडगे सर,कदम सर तांबवे सर,पांडुरंग साठे,महादेव सावंत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी यादव यांनी केले तर आभार दयानंद राक्षे सर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम सुषमा चंदनशिवे सावंत,रेश्मा काटे यांनी घेतले.
यावेळी परतीच्या प्रवासाला निघताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होते कारण एवढ्या वर्षांनी झालेली भेट काही क्षणातच संपणार होती.प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य होते पुन्हा कधी भेटायचे…!