पल्लवी मेणकर व सावित्रा कस्तुरे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर

Updated On:
---Advertisement---

पल्लवी मेणकर व सावित्रा कस्तुरे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर

महूद ,ता. २  : वुमन टीचर्स फोरम व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन यांच्यावतीने शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासाबरोबरच संस्कार रुजविणाऱ्या शिक्षिकांना देण्यात येणारा जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार सांगोला तालुक्यातील  पल्लवी मेणकर- महाजन व सावित्रा कस्तुरे-हवेली या शिक्षिकांना जाहीर झाला आहे. 

विविध उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळांमध्ये गुणवत्ता विकास व संस्कार रुजविणाऱ्या  शिक्षिकांना महिला दिनानिमित्त हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षीच्या पुरस्कारासाठी सांगोला तालुक्यातून बाबरसपताळवाडी (वासूद)येथे कार्यरत असणाऱ्या सावित्रा कस्तुरे-हवेली व मेटकरवाडी नंबर एक (महूद) येथे कार्यरत असणाऱ्या पल्लवी मेणकर- महाजन यांना जाहीर झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहामध्ये रविवार (ता.४) रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुणे येथील परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता लोहोकरे,समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे,राज्य कामगार विमा रुग्णालय मुंबई येथील मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. शशिकांत शिंदे व महिला बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पल्लवी मेणकर-महाजन  या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेटकरवाडी नंबर एक(महूद)येथे कार्यरत असून उपक्रमशील व आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी माता पालक  यांच्या सहकार्याने गुणवत्ता वाढीसाठी उल्लेखनीय काम केले आहे.विविध स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा,क्रीडा स्पर्धा यामध्ये मेणकर यांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.शालेय व सहशालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत वृक्षारोपण,वृक्षसंवर्धनात नियमित योगदान दिले आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या कलेला वाव,त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवणे व शैक्षणिक उठाव ही प्रभावी कामे केली आहेत.जल व्यवस्थापन चळवळीत सक्रिय सहभाग राहिला आहे.महिला मंडळाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण,आरोग्य व सक्षमीकरण यासाठी विविध उपक्रमात सहभाग.गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक मदत करत शंभर टक्के उपस्थितीत यश मिळवले आहे.त्यांना यापूर्वी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे.

सावित्रा कस्तुरे-हवेली यांच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी गुणवत्ता चाचणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.विविध स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.यापूर्वी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या शाळेलाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून  आरोग्य जागृतीचे कार्य, साने गुरुजी कथामालेद्वारे संस्कार पेरण्याचे कार्य, महिला सक्षमीकरणाचे कार्य करत आहेत.कथा, कविता, लेख लेखनाचा छंद जोपासत असून विविध मासिकात प्रसिद्ध झाले आहेत.त्यांना यापूर्वी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले,शिक्षण विस्ताराधिकारी लहू कांबळे,अमोल भंडारी,लक्ष्मीकांत कुमठेकर,केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे, दिलीप ढेरे,शिक्षक संघाचे नेते सुहास कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Follow Us On